top of page

तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा करून केले पलायन ... नावही बदलले ...

अखेर दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये केली अटक

नाशिकः तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या भूमाफिया पीयूष तिवारी याला दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये अटक केली. पीयूष तिवारी हा पुनीत भारद्वाजने या नावाने नाशिक येथे राहत होता. त्याच्यावर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये जवळपास 37 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेवर 50 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो नाशिकमध्ये रहात होता. याचा सुगावा दिल्ली पोलिसांना लागताच त्यांनी ही कारवाई केली.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जमीन घोटाळा केल्यानंतर पीयूष तिवारीच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. २०१६ ते २०१८ मध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिवारीने नाशिकमध्ये आपले बस्तान बसवले. त्यासाठी आपले नाव बदलले. पीयूष तिवारी ऐवजी लोकांना तो पुनीत भारद्वाज हे नाव सांगायचा. पीयूष तिवारीच्या गोरखधंद्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याला मदत केल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पत्नीलाही अटक केली. ती सध्या तुरुंगात आहे.

२०११ ते २०१८ पर्यंत त्याने एकूण १५ ते २० शेल कंपन्या तयार केल्या. २०१६ मध्ये त्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे 120 कोटींची रोकड सापडली होती. पीयूष तिवारी फक्त एकच फ्लॅट खरेदी करायचा. विशेष म्हणजे तो हाच फ्लॅट अनेकांना विकायचा. त्यातून त्याने अनेकांना गंडा घातला. त्याच्याविरोधात दिल्लीसह अनेक भागात गुन्हे दाखल झाले. तेव्हा त्याने तिथून पलायन केले.

दिल्ली पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून तिवारीच्या मागावर होते. तेव्हा 20 मार्च रोजी हा भामटा नाशिकमध्ये नाव बदलून रहात असल्याचे समजले. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये आले. तेव्हा त्यांना पीयूष तिवारी कांदा आणि अन्न पुरवठ्याच्या कामात उतरल्याचे दिसले. मग पोलिसांनी सगळ्या कांदा व्यापाऱ्यांची यादी तयार केली. तेव्हा त्यांना पुनीत भारद्वाजची खबर लागली. हीच व्यक्ती पीयूष तिवारी असल्याचा संशय आला. त्यांनी खातरजमा केली, तेव्हा हे खरे ठरले. आणि अखेर तिवारीला उचलण्यात आले.


bottom of page