top of page
Writer's pictureMahannewsonline

बँकेकडून झाली चूक... शिक्षकाचाही झाला गैरसमज आणि अखेर न्यायालयीन कोठडी ...

बँकेकडून झालेल्या चुकीमुळे एका शिक्षकाचा गैसमज झाला. या गैरसमजापायी शिक्षकाला न्यायालयीन कोठडीची हवा खावी लागल्याची घटना बिहारमध्ये घडली. रंजीत दास असं या शिक्षकाचं नाव असून त्यांच्या खात्यावर बँकेकडून चुकून ५ लाख ५० हजार रुपये जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खात्यावर हे पैसे जमा केल्याचा दावा करत या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये रंजीत दास यांच्या दक्षिण बिहार ग्रामीण बँकेतील खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा करण्यात आले. जेव्हा बँकेला आपली चूक कळली तेव्हा बँकेने दास यांच्याशी संपर्क साधला आणि पैसे तातडीने बँकेला परत करण्यासंदर्भात मागणी केली. बँकेने अनेकदा नोटीस पाठवूनही दास यांनी हे पैसे परत देण्यास नकार दिला. इतकच नाही तर दास यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आपण हे सर्व पैसे खर्च केल्याचंही सांगितलं. “जेव्हा माझ्या मोबाईलवर बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तेव्हा मला फार आनंद झाला. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा फार जास्त पैसा आहे. मला वाटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे मला पाठवले आहेत,” असं दास यांनी सांगितलं.

बँकेने दास यांच्या विरोधात विश्वासर्हता भंग करणे या गुन्ह्याखाली कमल ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी दास यांना अटक करुन स्थानिक न्यायालयासमोर दास यांना हजर करण्यात आलं असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



bottom of page