top of page
Writer's pictureMahannewsonline

सावधान ! कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही ...

देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये दोन कोरोनाबाधितांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर शनिवारी गुजरात आणि महाराष्ट्रातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडले. त्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता पाचवर गेली आहे.

दिल्लीत पहिला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो नुकताच टांझानियामधून परतला होता. आत्तापर्यंत विदेशातून आलेल्या एकूण १७ लोकांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

दरम्यान शनिवारी डोंबिवलीत ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला ३३ वर्षीय रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. सध्या तो डोंबिवली येथील कोरोना केंद्रामध्ये उपचार घेत आहे. त्याच्या अगदी जवळून संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या १२ जणांचा आणि कमी जोखमीच्या २३ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्ग झाला नसल्याचे सांगण्यात आले.

ओमिक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेत आढळल्याचं WHO कडून जाहीर करण्यात आलं. २६ नोव्हेंबर रोजी त्याच्या B.1.1.529 या कोडऐवजी त्याला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं असून ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार होतच असून हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक वेगाने फैलाव होणारा असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.


bottom of page