top of page

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट, तर्क-वितर्कांना उधाण!

राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले असून मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात असताना भाजपाने अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. राज ठाकरेंनी ही शक्यता फेटाळून लावली असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

मुंबईत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं, हे अद्याप समोर आलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र पाठवून फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपाच्याच उमेदवाराला आपलं मत दिलं. यामुळे देखील भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं.

दरम्यान, गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे. मात्र.सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या आणि मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.


bottom of page