top of page

Video: एसटी बस नदीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू

इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. अंमळनेरकडे निघालेली ही बस नर्मदा नदीवरील पुलावरुन खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. मध्य प्रदेशातील धार येथे सकाळी १० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला आहे. ही बस पाण्यात कोसळलेल्याचेही अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमधून या अपघाताची दाहकता दिसून येते.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महामंडळाची अपघातग्रस्त बस ( क्र. MH40 N 9848) सकाळी साडेसातच्या सुमारास इंदोरहून अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, एसटी बसचा अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातासंदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. त्याशिवाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. 09555899091 तसेच 02572223180/02572217193 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.



bottom of page