top of page
Writer's pictureMahannewsonline

Video: हिमाचल प्रदेशात ढगफुटी; घरं, गाड्या गेल्या वाहून

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला शहरात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाल्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. येथील मकलोडगंजपासून सुमारे दोन किमी अंतरावरील भागसू नाग येथे ही ढगफुटी झाली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने मांझी नदीला पूर आला. नदीचे पाणी वेगानं पाणी वाहू लागलं. त्यामुळे भागसू नाग गावातील अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत.तसेच रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या गाड्या, कार अक्षरशः वाहून गेल्या आहेत. तसेच अनेक हॉटेल, दुकानांचं मोठ नुकसान झालं आहे.

धर्मशाळेत शिला चौकाजवळ पाणी घुसल्यानं एक तीन मजली घर उद्ध्वस्त झाल्याचंही समोर येतंय. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यानं रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मदतीसाठी पोहचण्यात अडथळे येत आहेत. ढगफुटीच्या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आले आहेत. या व्हिडिओतून इथली भयावह परिस्थिती दिसून येतेय.

हिमाचलमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोरोना निर्बंध कमी झाल्यानंतर हिमाचल प्रदेशात सध्या पर्यटकांनी गर्दी केली आहे. विकेन्डला (शनिवारी - रविवारी) धर्मशाळेच्या मॅक्लोडगंज, भागसू धबधबा, भागसू मंदिर, स्तोवरी, नड्डी डल लेक, धर्मकोट, हैनी यांसहीत अनेक ठिकाणांवर पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीवर आणि रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बटालियनमधून ७५ जवानांची अतिरिक्त मदत बोलावण्यात आली होती. प्रशासनानं नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नद्यांच्या प्रवाहात उतरून आपला जीव धोक्यात टाकू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..



bottom of page