top of page
Writer's pictureMahannewsonline

‘पीएमसी’सह २१ सहकारी बँकांच्या छोट्या खातेदारांना दिलासा; पाच लाखांपर्यंतच्या ठेवी मिळणार परत

मुंबई: आर्थिक संकट, घोटाळ्यांमुळे अडचणीत आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी)बँक सह देशभरातील एकूण २१ बँकांच्या ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून कमाल पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ अर्थात ‘डीआयसीजीसी’ने ठेवीदारांना त्यांच्या हक्काची रक्कम डिसेंबरअखेरपासून मिळू शकेल, असे पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

‘ठेव विमा महामंडळा’ने मंगळवारी उशिरा प्रसिद्धी पत्रकाद्वारे २१ बँकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या बँकांच्या ठेवीदारांना आता सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये शिल्लक व व्याजासह मिळून जमा असलेल्या एकूण रकमेपैकी कमाल पाच लाख रुपयांपर्यंतची ठेव रक्कम २९ डिसेंबरपर्यंत मिळू शकणार आहे. ‘डीआयसीजीसी’ने संबंधित बँकांना पुढील ४५ दिवसांत दावे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आधी विमा भरपाईसाठी पात्र खातेदारांची १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आवश्यक छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. सर्व पात्र खातेदारांच्या दाव्यांची पडताळणी आणि काही अडचणी असल्यास त्यांचे निवारणाची ही संपूर्ण प्रक्रिया २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. यांनतर ३० दिवसांमध्ये म्हणजे २९ डिसेंबरपर्यंत ठेवीदारांना कमाल पाच लाखांपर्यंत भरपाई बँकांकडून दिली जाणार आहे.

ठेव विमा भरपाईस पात्र २१ बँकांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ११ बँकांचा समावेश आहे : या बँकांच्या छोट्या ठेवीदारांना खात्यातील पाच लाखांपर्यंतची ठेव परत मिळविता येणार आहे.

या आहेत महाराष्ट्रातील ११ बँका

  • पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) सहकारी बँक

  • रुपी सहकारी बँक

  • सिटी को-ऑपरेटिव्ह बँक

  • कपोल को-ऑपरेटिव्ह बँक

  • मराठा सहकारी बँक

  • नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव्ह बँक

  • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक

  • श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे

  • मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

  • सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक

  • इंडिपेडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. नाशिक.


bottom of page