top of page
Writer's pictureMahannewsonline

डॅशिंग वनअधिकारी दिपाली चव्हाण यांची गोळी झाडून आत्महत्या

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

साताऱ्याच्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत.


गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दिपाली यांच्या निवासस्थानावरून गोळी झाडल्याचा आवाज आला. परिसरातील नागरिक, वन कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावत पोहोचले. यावेळी दिपाली चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.



आत्महत्येपूर्वी दिपाली चव्हाण यांनी पत्र लिहून ठेवले होते. या पत्रात अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले असून अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. हरिसाल येथे रूजू झाल्यापासुन त्यांच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड तपासले गेले पाहिजे,अशी मागणीदेखील होत आहे. दरम्यान पत्रात दीपालीने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला ते उपवनसंरक्षक शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावर आज अटक करण्यात आली.


bottom of page