top of page
Writer's pictureMahannewsonline

६७ बनावट खात्यांद्वारे ५६० कोटी रुपयांची फसवणूक; माजी आमदाराविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना ईडीने १५ जून रोजी अटक केली होती. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने बँकेच्या माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. वर्ष २०१९-२० मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड पनवेल मुंबई विरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेकानंद पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत असल्याचे आढळून आले आणि ते पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांनी स्थापन केलेल्या नियंत्रित संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यासारख्या मालमत्ता बांधण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात आला. ६७ बनावट खात्यांद्वारे ही फसवणूक करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे ५६० कोटी रुपयांची होती.

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पुनर्तपासणी केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला होता.


bottom of page