top of page
Writer's pictureMahannewsonline

७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणात ईडीने 'एम्प्रेस मॅाल' घेतला ताब्यात

नागपूर : ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणी ईडीने काल बुधवारी गांधी तलाव येथील 'इम्प्रेस मॉल' आपल्या ताब्यात घेतला आहे. ईडीद्वारा प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) नुसार जवळपास ५०० कोटी रुपये किमतीची संपत्ती ताब्यात घेण्याची शहरातील ही पहिली कारवाई आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केएसएल इंडस्ट्रीजने २०१५ मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्रा बँकेकडून ५२५ कोटी तसेच यूको बँकेकडून २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या रकमेला शेल कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यात वळविण्यात आला होता. २०१६ मध्ये हा घोटाळा समोर आल्यानंतर ईडीने केएसएल इंडस्ट्रीजविरुद्ध पीएमएलएनुसार गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास ईडीची कोलकाता शाखा करीत आहे.

केएसएल इंडस्ट्रीजचे प्रमुख प्रवीणकुमार तायल यांच्याशी निगडित शेल कंपन्यांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त केले होते. ईडीने ८ मे २०१९ रोजी एम्प्रेस मॉलला अटॅच केले होते. एम्प्रेस मॉल २.७०.३७४ चौरस फुटात पसरलेला असून त्याची किंमत जवळपास ५०० कोटी रुपये आहे. एम्प्रेस मॉलसोबत ईडीने मुंबई येथील जवळपास २२५ कोटीची संपत्तीही अटॅच केली होती. ईडीच्या अटॅचमेंटच्या आदेशाला केएसएल इंडस्ट्रीजने आव्हान दिले होते. त्यामुळे मॉलवर ताबा घेण्याची प्रक्रिया अडकली होती. केएसएल इंडस्ट्रीजचे आव्हान रद्द केल्यानंतर बुधवारी दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक एम्प्रेस मॉलमध्ये पोहोचले. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून मॉल ताब्यात घेतला.


bottom of page