top of page
Writer's pictureMahannewsonline

भाजपा उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; चारजण निलंबित

सध्या देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. गुरुवारी (१ एप्रिल) विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मतदानानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. विशेष म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. मतदानानंतर एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडले व ती कार भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून भाजपवर जोरदार टीका केली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यावेळी गाडीमध्ये मतदान अधिकारी, निवडणूक आयोगाचा कर्मचारी असे कोणीही नव्हते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. “ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं,” असं आयोगाने सांगितलं.


bottom of page