top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रगती साधुया ‘प्रयोगशील शेतीतून’...

अनुभवाचा सल्ला मिळवा ‘रिसोर्स बँकेतून’…


आयुष्यात सगळ्यात जास्त आपण कशातून शिकतो तर, अनुभवातुन. त्यातही जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस समजला जातो. त्याचप्रमाणे "दुसऱ्याच्या अनुभवातून शिका, स्वतःवर प्रयोग करून शिकायला अख्खे आयुष्य कमी पडेल" हे अनुभवाचे बोल देखील आपण नेहमीच ऐकतो.

पारंपारीक शेती करीत असतांना मध्येच कुठेतरी बातमी ऐकायला मिळते अमुक शेतकऱ्याने शेतात असा प्रयोग केला त्यामुळे त्याला असा फायदा झाला, तर कोणाला इतका नफा झाला. हे प्रयोगशील शेतकरी, अभिनव उपक्रम, तंत्रज्ञान, आणि सुधारित शेती पध्दत वापरून नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे विविध उत्पादनात वाढ करून आर्थिक समृद्धी साधतात. मात्र त्यांनी नेमके काय प्रयोग केले, आपल्याकडे देखील तेवढीच शेती आहे, परिस्थतीही जवळपास तशीच, मग तरिही आपण शेतीच्या आर्थिक गणितात कुठे मागे पडतो. वाडवडीलांपासून आपण याच पद्धतीने शेती करत आलो आहे. तरी आपल्याला इतरांप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात यश का येत नाही. विविध पिकांचे तंत्रज्ञान, वाणांची निवड, खतांची मात्रा, किड रोग प्रादुर्भाव व नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कृषी विभागाच्या योजना व शेतमालाचे विपणन इत्यादी गोष्टींबाबत प्रयोगशील आदर्श शेतकऱ्याचे मार्गदर्शन व अनुभवी सल्ला घेता आला तर किती बरे झाले असते. त्यातून आपलीदेखील आर्थिक उन्नती होऊ शकते, हा विचार बहुसंख्या शेतकऱ्यांच्या मनात येतो. पण हा अनुभव देणाऱ्यांची माहिती आपल्याला कुठे मिळेल, ही देखील एक मोठी समस्या आतापर्यंत होती.


मात्र महाविकास आघाडी शासनाचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या मनातील ही बाब अचुक हेरली व ज्या शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवला, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेची माहिती त्यांचेकडूनच इतरांना मिळावी, शेतीतंत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील इतर शेतकऱ्यांना व्हावा, त्यातून शेतपिकांचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्याला दोन पैसा जास्त प्राप्त व्हावा, सर्वांना आर्थिक सुबत्ता मिळावी, या उद्देशातून प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती एकत्र केली. या माहितीला त्यांनी ‘रिसोर्स बँक’ असे नाव दिले असून प्रयोगशील शेतकऱ्यांची ही माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सर्वांना उपलब्ध करून दिली आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथील आदिवासी प्रयोगशील शेतकरी महेंद्र नैताम यांच्या हस्ते व कृषी मंत्री दादा भुसे, वनमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 जुलै 2020 रोजी या संकेतस्थळाचे उद्घाटन करून सिसोर्स बँकेचा शुभारंभ करण्यात आला होता. आजघडीला पाच हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘रिसोर्स बँक’ या नावाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जिल्हानिहाय प्रयोगशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी, त्यांचा संपुर्ण पत्ता, भ्रमणध्वनी, घेतलेले नाविण्यापुर्ण पिकाचे नाव व अवलंबिलेले आधुनिक नाविण्यापूर्ण तंत्रज्ञान या बाबींचा यादीत समावेश आहे. त्यांना भ्रमणध्वनीवरून किंवा दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतून आपली प्रगती साधण्याचा मार्ग इतर शेतकऱ्यांना मिळविता येईल. विशेष म्हणजे ही अनुभवाची शिदोरी वाटल्याने अधिक समृद्ध होणार आहे.


या रिसोर्स बँकेत चंद्रपूर-गडचिरोली पासून ठाणे-पालघर पर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील पुरस्कार्थी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आहे. यात ठाणे विभागाच्या पाच जिल्ह्यातील 670 शेतकरी, नाशिक विभागाच्या चार जिल्ह्यातून 742, पुणे विभागाच्या तीन जिल्ह्यातील 369, कोल्हापूर विभागाच्या तीन जिल्ह्यातील 537, औरंगाबाद विभागाच्या तीन जिल्ह्यातील 289, लातूर विभागाच्या पाच जिल्ह्यातील 660, अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यातील 858 व नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यातून 884 असे एकूण 5009 प्रयोगशील शेतकऱ्यांच्या नावांचा यादीत समावेश आहे.


शेतात प्रयोग करणारे हे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर शेतकऱ्यांनादेखील लाभ व्हावा, त्यांच्या पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व उत्पन्नात वाढ होऊन प्रगती साधणे, हीच राज्य शासनाची अपेक्षा आहे. चला तर मग या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आपल्या शेतीच्या विकासासाठी फायदा करून घेवू, आणि इतर शेतकऱ्यांनाही सांगू की… ‘प्रगती साधुया प्रयोगशील शेतीतून... आणि अनुभवाचे कर्ज घेवुया.. रिसोर्स बँकेतून….’


- गजानन वि. जाधव.

मा.स. जि.मा.का. चंद्रपूर.(9923380906)


bottom of page