top of page

वडिलांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला ठेवून ७ मुलांमध्ये हाणामारी

वडिलांच्या मृत्यूनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जाताना ७ मुलांमध्ये हाणामारी झाली. यानंतर कोणीतरी पोलीस कंट्रोलला फोन करून याबाबत माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत त्या ८५ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रकार हरयाणातील नरियाला गावात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीला ७ मुलं असून सातही जणं वेगवेगळे राहतात. वडिलांच्या मृत्यूनंतर एका मुलाने मोठा मृत्यूभोज कार्यक्रम करण्यास सांगितला. याचा सहाही मुलांनी विरोघ केला. यादरम्यान मुलांमधील वाद झाला आणि सातही जणं मारामारी करू लागले. कसेबसे गावातील लोकांनी व नातेवाइकांनी प्रकरण शांत केले आणि वृद्धाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यास सुरुवात केली. यादरम्यान वाटेत पुन्हा मुलांमध्ये भांडण सुरू झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. अंत्ययात्रेला जाणाऱ्या लोकांनी मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवून प्रकरण शांत केले, यानंतर कोणीतरी पोलीस कंट्रोलला फोन करून याबाबत सूचना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या मारामारीत तिघे जखमी झाले आहेत. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे अंत्यसंस्काराच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या महिलांमध्येही वाद झाले.



bottom of page