top of page

अग्नितांडव! कामगार झोपेत असतानाच गोडाऊनमध्ये भीषण आग; ११ जणांचा होरपळून मृत्यू

भंगाराच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याने ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबादमधील भोईगुडा येथे पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. आगीने संपूर्ण गोडाऊनला जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाने ११ मृतदेह बाहेर काढले असून ते सर्व बिहारमधील स्थलांतरित मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईगुडा भागातील IDH कॉलनी येथील गोडाऊनच्या वरच्या मजल्यावर सुमारे १२ कामगार झोपले असताना पहाटे ३ च्या सुमारास ही आग लागली. मात्र शटर बंद असल्याने कामगारांना तेथून बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. “एक कामगार इमारतीमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली. गोडाऊनमधील फायबर केबलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.




bottom of page