top of page
Writer's pictureMahannewsonline

अवघ्या १५ मिनिटांमध्ये सारं काही पाण्याखाली गेलं; १५३ जणांचा मृत्यू,शेकडो बेपत्ता

युरोपमधील काही भागांमध्ये आलेल्या पुरामध्ये संपूर्ण गावच्या गावं वाहून गेली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत १५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १३३ जण हे पश्चिम जर्मनीतील आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू असून बेपत्ता झालेल्या अन्य शेकडो जणांचा कसून शोध घेतला जात आहे.

अचानक आलेल्या या पुरामुळे स्थानिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. बेल्जियमच्या काही भागांनाही या पुराचा फटका बसला असून शुक्रवारच्या आकडेवारीनुसार बेल्जियममधील २० जणांचा आतापर्यंत या पुरामध्ये मृत्यू झालाय. जर्मनीतील जवळपास १३०० जण अद्यापही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लक्झ्मबर्ग आणि नेदरलँड्सलाही या पुराचा फटका बसला असून येथे हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या असून झाडंही उन्मळून पडली आहेत आणि घरे कोसळली आहेत. “अवघ्या १५ मिनिटांमध्ये सारं काही पाण्याखाली गेलं, आमचं ऑफिस, घर, शेजाऱ्यांचं घर सगळीकडे पाणीच पाणी आहे” असं येथील एका २१ वर्षीय डेकोरेटर असणाऱ्या अ‍ॅगरॉन बेर्शिचा याने एफपीशी बोलताना सांगितलं. आम्ही मागील २० वर्षांपासून येथे राहत आहोत. मात्र यापूर्वी निर्सगाचा असा प्रकोप कधीही पाहिला नाही. हे एखाद्या युद्धभूमीमध्ये असल्यासारखं आहे, असं येथील स्थानिकांनी म्हटलं आहे.



bottom of page