top of page
Writer's pictureMahannewsonline

…अन् वयाच्या ८६व्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांनी दिली दहावीची परीक्षा

मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हटले जाते. याची प्रचिती हरियाणात आली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी बुधवारी दहावीची परीक्षा दिली. ओमप्रकाश चौटाला सिरसा येथील आर्य कन्या वरिष्ठ माध्यमिक शाळेत दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा देण्यासाठी दाखल झाले होते. परीक्षा केंद्रावर पोहोचले असताना तेथे उपस्थित प्रसारमाध्यांना, “मी विद्यार्थी आहे, नो कमेंट्स” म्हणत काही बोलणं टाळलं. यावेळी त्यांनी कोणतंही राजकीय भाष्य टाळलं. यानंतर ८६ वर्षीय ओमप्रकाश चौटाला परीक्षा देण्यासाठी गेले.

ओमप्रकाश चौटाला यांनी गतवर्षी हरियाणा ओपन बोर्डाकडून बारावीची परीक्षा दिली होती. पण त्यांनी दहावीची इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने ५ ऑगस्टला निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आपला बारावीचा निकाल मिळवण्यासाठीच चौटाला दहावीच्या परीक्षेसाठी पोहोचले होते. दरम्यान पेपर लिहिण्यासाठी चौटाला यांनी केलेली लेखकाची मागणी शिक्षण विभागाने मान्य केली होती. दोन तासात चौटाला यांनी पेपर पूर्ण केला.


जेबीटी घोटाळ्याची शिक्षा भोग असताना २०१३ ते २०२१ दरम्यान चौटाला यांनी तिहार जेलमध्ये दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता. २०१७ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलमधून उर्दू, सायन्स, सोशल स्टडीज आणि इंडियन कल्चर ॲण्ड हेरिटेज विषयांमध्ये ५३,४ टक्के गुण मिळवले होते.


bottom of page