top of page
Writer's pictureMahannewsonline

Video: गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला भीषण आग

नंदूरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. आज सकाळी नंदुरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम एक्सप्रेसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळालं. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

आज सकाळी गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ट्रेन निघाली होती. नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर ट्रेन आली असताना अचानक एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असते. त्या ठिकाणीच आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीबरोबर धुराचे लोळही पसरल्याने प्रवाशी घाबरून गेले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला.

आग लागल्याचे समजताच मोटरमनने ट्रेन थांबवली. यावेळी रेल्वेचे कर्मचारी, जवान आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ प्रवाशांना बाहेर काढले. ज्या डब्यांना आग लागली ते डबे इतर डब्यांपासून वेगळे केले गेले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे दोन्ही डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.


bottom of page