top of page
Writer's pictureMahannewsonline

जॉयनिंग लेटर खोटं, ट्रेनिंगही खोटं; सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणारी टोळी गजाआड

नांदेड : सुशिक्षित तरूणांना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणारी टोळी हिंगोली पोलिसांनी गजाआड केली आहे. विशेष म्हणजे संबंधित टोळी ही तब्बल 9 राज्यांमध्ये कार्यरत होती. या टोळीने आतापर्यंत शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी लुबाडलं आहे. खोटं जॉयनिंग लेटर द्यायचे तसेच खोट्या ट्रेनिंगचाही बनाव ही टोळी करत असे. अनेक तरुण ट्रेनिंगला लागल्यानंतर नोकरीला लावल्यानिमित्ताने लाखो रुपये या टोळीला द्यायचे. पण नंतर त्यांना आपण फसवलो गेलो, याची जाणीव व्हायची. अखेर पोलिसांनी या टोळीतील 7 आरोपींना विविध राज्यांमधून अटक केली असून सुशिक्षित तरुणांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र पोलिसांनी भंडाफोड केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस स्थानकात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हिंगोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता या रॅकेटची व्याप्ती देशातील अनेक राज्यात पसरली असल्याचे समोर आलं. ही टोळी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना हेरायची. या तरुणांना रेल्वे, मुंबई महापालिका, एफसीआय, सीआयएसएफ अशा ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवले जायचे. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यातील अनेकांना या टोळीने आपल्या जाळ्यात ओढले होते

तरुणांना खरं पटावं यासाठी तरुणांचं काही ठिकाणी बनावट ट्रेनिंग घेतलं जायचं. ट्रेनिंग होत असल्याने विश्वासाने शेकडो तरुणांनी त्यांना पैसे दिले. नोकरीचे बनावट ऑर्डर दिल्या जायच्या. मूळ नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर मात्र आपली फसवणूक झाल्याचे उघड व्हायचे. फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी नांदेड, मुंबई, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि दिल्ली येथून अटक केली. त्यांच्याकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडे आतापर्यंत फसवणूक झालेल्या 25 जणांनी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची व्यापती मोठी असून फसवणूक झालेल्या सर्वांनी वसमत पोलीस किंवा हिंगोली पोलीसांकडे तक्रार करण्याचे आवाहन नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.


bottom of page