top of page
Writer's pictureMahannewsonline

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.


असा होता राजकीय प्रवास

गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले.


एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांनी आमदारकी कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. सहकाराबरोबर तालुक्याच्या पाण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी ते हिरारीने पुढाकार घेतला. विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले.


मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आमदारकीचा कुठलाही रूबाब न दाखवता लोकसेवेचं काम त्यांनी केलं. वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक (२०१९ ची विधानसभा निवडणूक) न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसले होते. इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं. आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. अगदी मोदी लाटेतही गणपतराव देशमुखांना लोकांनी आमदार केलं. त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यामुळेच एका पक्षात राहून ते तब्बल ११ वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले

गणपतराव देशमुख यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरली. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात निधनाच्या वृत्ताने नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. 'आपल्यातील, आपला माणुस हरपला' अशी भावना सामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यात झाली होती. आयुष्यभर त्यांनी आपला वेळ, आपली राजकीय ताकद जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालविली होती. देशमुख यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला, अशीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.


bottom of page