top of page
Writer's pictureMahannewsonline

…तर पुन्हा एकदा अफगाणी जनतेसमोर राष्ट्राध्यक्षाला फासावर लटकवलं असतं

संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेतला आश्रय - अशरफ घनी

तालिबानने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर घनी पहिल्यांदाच समोर आले आहेत. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत घनी यांनी आपण देशामध्येच थांबलो असतो तर आपली हत्या झाली असती अशी भीती व्यक्त केलीय. तालिबान्यांना घाबरून देश सोडला नसून, एक जबाबदार लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून देश सोडल्याचं वक्तव्य करत सध्या आपण संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला असल्याचं घनी यांनी सांगितलं आहे.

चार गाड्या भरुन पैसे सोबत घेऊन गेल्याचे आरोपाचे खंडण करताना घनी यांनी कोणत्या परिस्थितीत आपण देशातून पलायन केलं याबद्दल भाष्य केलं. “मी तातडीने देश सोडला की मला माझ्या स्लिपर्स आणि बूट सोबत घेण्यासही वेळ मिळाला नाही. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला,” असा दावा घनी यांनी केलाय. फेसबुकवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घनी यांनी “मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवलं असतं,” असं म्हटलं आहे. मोहम्मद नजीबुल्लाह या अफगाणी राष्ट्राध्यक्षाला तालिबानने २७ सप्टेंबर १९९६ रोजी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह काबूलमधील राजवाड्यासमोरच्या सिग्नलवर लटकवण्यात आला होता.



bottom of page