top of page

राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केली होती. तशी माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानुसार भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज मंजूर करण्यात आला असून झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी ...

  • रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

  • निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

  • लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

  • लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम

  • विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड

  • ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख

  • सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड

  • शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

  • गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम

  • अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर

  • एल गणेशन, राज्यपाल, नागालँड

  • फागू चौहान, राज्यपाल, मेघालय




bottom of page