top of page

‘जनाब राऊत’, माझ्यासारखं महाराष्ट्रात सुरक्षेच्याविना फिरा म्हणजे ...

गोपीचंद पडळकर यांचं संजय राऊत यांना खुले आव्हान

केंद्र सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना "वाय" दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावरुन आज शिवसेनेनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखामधून अती महत्वाच्या व्यक्तींना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेसंदर्भातील धोरणात्मक निर्णयांवर शिवसेनेनं निशाणा साधलाय. याला उत्तर देताना आता भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांना आव्हान दिलं आहे. जनाब राऊत अजूनही ऊर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहावा असं वाटलं नाही. जनाब राऊत, तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखं महाराष्ट्रात सुरक्षेविना फिरा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल, असं पडळकर यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला आहे. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्याबाबत बाबत दिसतेय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

जनाब राऊत तुमच्या माहिती करिता सांगतो, जेव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी ‘कोई माई का लाल तिरंगा लहराके दिखाये’ अशा धमक्या देणारी पोस्टर्स लावली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी धमक्यांना भीक न घालता, न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता, असंही त्यांनी सांगितलं.


bottom of page