top of page

आजपासून पीठ, पनीर, दही यावरही द्यावा लागणार 'जीएसटी’

एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस चे दर वाढल्यामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या जनतेला आजपासून पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे. आज, सोमवारपासून केंद्र सरकारने वाढवलेल्या वस्तू आणि सेवाकराची (GST ) भर पडणार आहे. आजपासून पॅकिंग केलेले पीठ, पनीर, दही यावरही 'जीएसटी’ (GST) द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतील उपचारही महाग होणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनमध्ये वस्तू-सेवाकरातील विसंगती दूर करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांवर कर (GST) आकारणीचा आणि वाढीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पीठ, पनीर, दही, लस्सी यासारखे पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ आतापर्यंत जे ‘जीएसटी’मुक्त होते, त्यांवर आजपासून पाच टक्के जीएसटी भरावा लागेल. त्याचबरोबर रुग्णालयातील पाच हजारांहून अधिक भाडे असलेल्या खोलीसाठीही पाच टक्के जीएसटी भार रुग्णांवर पडणार आहे. छपाई, लेखन किंवा शाई, वस्तरे, चाकू आणि पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, रेखांकन आणि चिन्हांकन साधने यांच्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत तर सौरऊर्जेवरील वॉटर हीटरवर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.




bottom of page