top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन

मुंबई: आता तरी देवा मला पावशील का?… , तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता… माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू… पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा… आदी एकापेक्षा एक सरस गाणी लिहून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं शनिवारी रात्री निधन झालं. हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते.

जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे शिक्षक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांनी पहिलं गाणं लिहिलं होतं. मात्र, हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली होती.


हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा… तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा… माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… आता तरी देवा मला पावशील का?... आदी गाणी लिहीली आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.


bottom of page