top of page

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सातत्याने बाहेरचे पदार्थ खाण्यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढत आहे.हृदयरोगाचं प्रमाण वाढत असल्याने आता प्रत्येकानेच आपल्या हृदयाची काळजी घेण्याची गरज आहे. आज काल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही, वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १ कोटी ७९ लाख लोक हृदयरोगाने मृत्यूमुखी पडतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास ३०% मृत्यू हृदयरोगामुळे होतात.

२९ सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिन (वर्ल्ड हार्ट डे) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे अरबट चरबट खाण्याची सवयही त्याला कारणीभूत असल्याने लहान मुले आणि मध्यम वयातील लोकांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज वाटत आहे.

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी. कुटुंबात कोणाला हृदयरोग असेल तर धोक्याची शक्यता दुपटीने वाढते.

सध्या कोरोना व्हायरसचे जगभर थैमान चालूच आहे. कोरोनाच्या विळख्यातून बरा होऊन आलेल्या रुग्णाला कोणते आजार विळखा घालतील याबद्दल स्पष्टपणे सांगता येत नाही. कोरोना व्हायरस केवळ फुफ्फुसांवरच नाही तर संपूर्ण शरीरावर विध्वंसक परिणाम करू शकतो. एका नव्या अभ्यासानुसार कोरोनाचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. जेएएमए या कार्डिओलॉजी संबंधित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोरोनामध्ये हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांमध्ये हृदयाच्या समस्यांसह गंभीर आजाराचा धोका जास्त असतो. कोरोना व्हायरसपासून बरं होणाऱ्या रुग्णांमधील 78 टक्के रुग्णांमध्ये हृदयाची विकृती असल्याचं दिसून आलं आहे.


आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही टीप्स..

⬛ अधिक तळलेले अन्न, तूप, लोणी, मीठ, मिरपूड आणि मिठाळी खाण्याने शरीरात कॅलरीज, कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते.
⬛ नियमित व्यायाम करावा. श्रमदायक व्यायाम करायचा नसेल, तरी दररोज किमान २५ ते ३० मिनिटे वेगाने चालणे हृदयरोग टाळण्यासाठी उपयुक्त आहे.
⬛ तंबाखू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले.
⬛ गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे या गोष्टी टाळाव्या.
⬛ हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहते आणि रक्ताभिसरणही चांगले होते.
⬛ आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा.
⬛ संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.
⬛ खाण्याबाबत बेफिकीर व फास्टफूड, तळलेले व मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळा.

bottom of page