top of page
Writer's pictureMahannewsonline

पुढील ५ दिवस राज्यातील 'या' जिल्ह्यात उष्णतेची लाट

हवामान खात्याने अलर्ट जारी केला

मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

२९ मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट धडकणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

३१ मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांना उन्हापासून किंचितसा दिलासा मिळणार आहे. तर जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील कमाल तापमान ३५ ते ४० च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत पश्चिम हिमालयातील काही भागासह गुजरातमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. २९ ते ३१ मार्च दरम्यान दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. रविवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.शनिवारी (२६ मार्च) याच भागात देशातील उच्चांकी ४२.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती.


bottom of page