top of page

ICC Women's T20 World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर ७ विकेटसनी दणदणीत विजय

आयसीसी टी-२० महिला वर्ल्ड कप स्पर्धेत आज (रविवारी) भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध झाला. पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला भारताच्या दिप्ती शर्माने पहिला दणका दिला. दुसऱ्याच षटकात तिने सलामीवीर जावेरिया खानला हरमनप्रीतकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर मुनीबा अली आणि बिम्साह मारूफ यांनी डाव सावरला पण राधा यादवने ही जोडी फोडली. तिने मुनीबाला बाद केलं तेव्हा पाकिस्तानची अवस्था ६.५ षटकात २ बाद ४२ अशी झाली.होती. यानंतर बिस्माह मारूफ आणि आयेशा नसीम यांनी फटकेबाजी करत संघाचं शतक १६ व्या षटकात धावफलकावर लावलं. बिस्माह आणि आयेशाने ९१ धावांची भागिदारी केली. कर्णधार बिस्माहने अर्धशतकी खेळी केली शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने एकही विकेट न गमावता ५८ धावा केल्या. २० षटकांनंतर पाकिस्तानने ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली वर्मानं २५ चेंडूंमध्ये चार चौकारांसह ३३ धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रित कौरलाही १२ धावांवर समाधान मानावं लागलं. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारले. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहच्या टी२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते. जेमिमाह रॉड्रीक्सनं पाकिस्तानच्या फलंदाजांची तुफान धुलाई करत ३८ चेंडूत ५३ धावा ठोकल्या. तर रिचा घोषनेही तिला जबरदस्त साथ देत ३१ धावा केल्या.




bottom of page