top of page
Writer's pictureMahannewsonline

ऐतिहासिक विजय; भारताने इंग्लंडचा १५१ धावांनी केला पराभव

लंडन : दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांची अष्टपैलू कामगिरी तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. विजयासाठी २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १२० धावांमध्ये गारद झाला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाचव्या दिवशी भारताचा भरवश्याचा फलंदाज रिषभ पंत (२२) हा लवकर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत असतानाच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी ८९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले. डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने तीन चौकारांच्या जोरावर नाबाद ३६ धावा केल्या. भारताने ८ बाद २९८ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला आणि इंग्लंडला इंग्लंडला विजयासाठी ६० षटकात २७२ धावांचे आव्हान दिले.

भारताच्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याच्यापाठोपाठ शमीने दुसऱ्या षटकात टीम इंडियाला दुसरे यश मिळवून देत इंग्लंडला अडचणीत आणले. इंग्लंडची २ बाद १ धाव अशी दयनीय अवस्था केली होती. त्यानंतर काही काळ इंग्लंडता कर्णधार जो रुट हा खेळपट्टीवर ठाण मांडून होता, पण यावेळी बुमराने रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद केले आणि भारताला मोठे यश मिळाले. इंग्लंडची ५ बाद ६७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या एकाच षटकात इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद केले आणि सामना भारताच्या दृष्टीपथात आला होता. ​इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार ज्यो रुट (३३), जोस बटलर ( २५) आणि मोई अली (१३) वगळता अन्य एकाही इंग्लिश क्रिकेटरला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. जसप्रित बुमराहच्या ३, इशांत शर्मा २ आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.



bottom of page