top of page
Writer's pictureMahannewsonline

Ind vs Wi T20 : भारताचा दणदणीत विजय; मालिका ३-० ने जिंकली

सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर आणि मालिकावीर

कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव केला. आणि मालिका ३-० ने जिंकली . सूर्यकुमार यादव हा सामनावीर तसेच मालिकावीर ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. वेस्ट इंडिजचा संघ मात्र ९ बाद १६७ धावाच करू शकला. या विजयासह टीम इंडिया टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

आजच्या सामन्यात भारताने ४ बदल केले . विराट कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंतच्या जागी श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खान आणि युजवेंद्र चहलच्या जागी शार्दुल ठाकूर याना संधी देण्यात आली. वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. ४ धावांवर ऋतुराज जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत किशनने अर्धशतकी भागीदारी रचली. हेडन वॉल्शने अय्यरला (२५) बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर किशनही माघारी परतला. त्याने ५ चौकारांसह ३४ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्माला केवळ ७ धावा करता आल्या. ९३ धावांवर भारताने ४ फलंदाज गमावले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. १९ आणि २०व्या षटकात भारताने प्रत्येकी २१ धावा काढल्या. सूर्यकुमारने ३१ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली, तर अय्यर ४ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला. भारताने २० षटकात ५ बाद १८४ धावा केल्या.

भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने काईल मेयर्स (६) आणि शाई होपला (८) तंबूत पाठवले. त्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. या दोघांनी स्फोटक फटके खेळले. पॉवेल (२५) मोठा फटका मारण्याच्या नादात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. शार्दुल ठाकूरने पॉवेलचा अप्रतिम झेल टिपला. विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड (५) आणि जेसन होल्डर (२) हे ही स्वस्तात बाद झाले. व्यंकटेश अय्यरने दोघांना बाद केले. हर्षल पटेलने रोस्टन चेसची दांडी गुल करत विंडीजची ६ बाद १०० अशी अवस्था केली,. त्यानंतर निकोलस पूरनने रोमारियो शेफर्डसोबत ६८ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. १८ व्या षटकात शार्दुल ठाकूरने पूरनला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. पूरनने ८ चौकार आणि एका षटकारासह ६१ धावा केल्या. १९ व्या षटकात शेफर्डही (२९) बाद झाला आणि विंडीजच्या विजयाच्या आशा मावळल्या. २० षटकात विंडीजला ९ बाद १६७ धावांपर्यंतच पोहोचला आले. भारताकडून हर्षल पटेलने ३ बळी घेतले. तर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर यांना २ बळी मिळाले. या विजयासह भारताने टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.


bottom of page