top of page
Writer's pictureMahannewsonline

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना

वर्धा: राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष कक्षास आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाबद्दल  प्राप्त होणा-या सर्व प्रकारच्या तक्रारींची योग्यरीत्या दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दाखल प्रकरणे व संवेदनशील क्षेत्र याबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष कार्यरत असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या शक्ती वाहिनी विरुध्द भारत सरकार रिट याचिकेत आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना ऑनर किलींगपासुन संरक्षण पुरवून ऑनर किलींगच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी जिल्ह्यांतर्गत अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्थात्मक यंत्रणेच्या कार्याचा आढावा तसेच सदर न्यायालयानी आदेशाची अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना आवश्यकतेप्रमाणे  सुरक्षागृह पुरविण्याकरीता सामाजिक न्याय भवन येथे सुरक्षागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. जोडप्यांना सदर सुरक्षागृह सुरवातीला एका महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर गांर्भीय लक्षात घेता जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

bottom of page