top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनामुळे IPL स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

कोरोनाचा फटका आता आयपीएललाही बसला असून सोमवारी कोलकाता संघाच्या २ खेळाडूंना व चेन्नईच्याही ३ खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे.

सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे असून पूर्ण रद्द केलेली नाही. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरित स्पर्धा घेता येईल का; कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

आयपीएल मध्ये कोरोनाने घुसखोरी केल्यानंतर पुढील सर्व सामने मुंबईमध्ये खेळवण्यावर बीसीआय विचार करत असतानाच हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. खेळाडूंनाही कोरोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.


आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला.


bottom of page