top of page
Writer's pictureMahannewsonline

क्रिकेटच्या वादात मध्यस्थी केल्यानं उपमहापौरांवर गोळीबार

जळगाव : क्रिकेटच्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोराचा नेम चुकल्याने कुलभूषण पाटील हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना कुलभूषण पाटील यांच्या राहत्या घराजवळ म्हणजेच, पिंपराला येथील मयूर कॉलनी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी खोटेनगर परिसराजवळ असलेल्या मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन जोरदार वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी दुपारच्या सुमारास उपमहापौर कुलभाषण पाटील गेले होते. त्यावेळी या दोघांतील वाद मिटविण्यास कुलभूषण पाटील यांना यश मिळालं खरं, मात्र काही वेळाने इनोव्हा कारमधून आलेल्या चौघांनी रस्त्यावरच कुलभूषण पाटील यांना अडवून भांडणात मध्यस्थी का केली? अशी विचारणा केली. तसेच कुलभूषण पाटील यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी त्यांच्यातील एकाने कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केला. मात्र त्याचा नेम चुकला आणि कुलभूषण पाटील बचावले. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


bottom of page