top of page
Writer's pictureMahannewsonline

जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून कठोर निर्बंध

जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून (दि.17 ) ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार असून सकाळी 7 ते 11 दरम्यानच अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. गर्दी करणारे, नियमांचे पालन न करणारे यांच्यावर सोमवार पासून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जळगाव महापालिका आयुक्तांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाच्या ब्रेक द चेन अंतर्गत गेल्या महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यानच अत्यावश्यक सुविधा देणारे व्यवहार सुरु आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. मात्र, लॉकडाऊन काळात देखील काही जण नियम पाळत नसल्याने अद्याप करोना साखळी पूर्ण तुटलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, महापालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर आज दुपारी पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतिष कुलकर्णी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, जिल्ह्यात संसर्ग कमी झाला असला तरी अपेक्षित यश अजून आपल्याला मिळाले नाही. तसेच कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात येत-जात असल्याने सुपर स्प्रेडर ठरत आहेत. ही बाब लक्षात घेता रुग्णांशी व्हिडिओ कॉल, केअर टेकर, वॅार्डबॉयच्या माध्यमातून संपर्क करून देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी एक दिवस अगोदर लसीकरणाचे कुपन दिले जाणार आहे. कठोर निर्बंधांच्या काळात लसीकरणासाठी जाणाऱ्यांनी स्वत:जवळ कुपन, ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा मेसेज जवळ ठेवावा. त्याची खात्री करूनच त्यांना केंद्रावर जाता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.



पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. अनावश्यक गर्दी, फिरणे, मॉर्निंग वॉक, तसेच मेडिकल, दवाखानाच्या नावाखाली देखील अनेक जण फिरताना दिसत आहे. तसेच चौकात, टपऱ्यांवर, हातगाड्यांवर अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हे व आर्थिक दंड देखील केला जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी वाहनांवर देखील कारवाई केली जाणार आहे.


महापालिका आयुक्त सतिष कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यासाठी फळ आणि भाजी विक्रेत्यांनी महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच बसून व्रिकी करावीत. अनधिकृत जागेवर तसेच सकाळी 7 ते 11 या नियोजित वेळेआधी किंवा नंतर आणि इतर कोठेही विक्री करतांना आढळल्यास त्यांचेवर अतिक्रमण विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ठिकाणांवर जाऊन जे काही खरेदी करायचे आहे ते करावे.


bottom of page