top of page
Writer's pictureMahannewsonline

हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं...

सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यकष जयंत पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरु होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच पोलिसांवरील ताण कमी करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले, सांगलीतील पोलिस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

खरंतर २००९ मध्ये आर आर आबा पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने आपल्यावर गृहखात्याची जबाबदारी सोपवलेली होती. तेव्हा गृहखाते घेण्याआधी एका लग्नाकार्यात आर आर आणि मी दोघे गेलो होतो. त्यावेळी आपण आबांना विचारले, गृहखाते कसं असतं? त्यावेळी आबांना मला विचारले की ? तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी आबांना सांगितलं, मला अजिबात त्रास नाही. त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील.आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला,आपल्या खासगी सचिवालाही ब्लड प्रेशर सुरू झाले, इतके तणावपूर्ण काम असते, त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे, की आता ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, शुगर मागे लावून घ्यायचा नाही, अशी आपली भूमिका आहे.

पण मंत्र्यांवर एवढा ताण असेल तर पोलिस किती तणावाखाली जगत असतील, याचा विचार केला पाहिजे. त्याच बरोबर पोलिसांच्या सुदृढतेकडे लक्ष देण्याबरोबर त्यांना थोडा थोडा आराम देण्यासह, त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.


bottom of page