top of page
Writer's pictureMahannewsonline

अमिताभ यांच्या सुरक्षेत असलेल्या "त्या" पोलीस कॉन्स्टेबलची बदली

मुंबई: अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात ड्युटी देण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून दरवर्षी अंदाजे दीड कोटी रुपये सुरक्षा पुरविण्यासाठी मिळत असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यांची ही बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

देशातील बड्या व्यक्तींना व सेलिब्रिटींना आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षा पुरवली जाते. अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. दोन कॉन्स्टेबल सतत त्यांच्यासोबत असतात. शिंदे हे त्यापैकी एक आहेत. शिंदे हे २०१५ पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते. कुठल्याही पोलीस कॉन्स्टेबलला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी ड्युटी लावली जाऊ नये, अशा सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ही बदली झाल्याचं सांगितलं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये शिंदे बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून वावरतानाचे फोटोही समोर आले आहेत. चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीचा सेट आणि प्रमोशनसाठी जितेंद्र शिंदे जातीने हजर असायचा.

दरम्यान जितेंद्र शिंदेच्या पत्नीच्या नावे एक सिक्युरिटी एजन्सी असल्याचाही आरोप आहे. त्यात जितेंद्र पैसे गुंतवत असल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत. मात्र, शिंदे यांना अमिताभ यांच्याकडून वर्षाला दीड कोटी रुपये मिळत होते. म्हणजे महिन्याला त्यांची कमाई १२ लाखांच्याही वर होती. हे त्यांच्या बदलीचं प्रमुख कारण असल्याचं सूत्रांकडून समजतं.

शिंदे यांची विभागीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न व मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. शिंदे यांची स्वत:ची खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी आहे. त्यांची पत्नी या एजन्सीचा कारभार बघत असून सेलिब्रिटिंना या एजन्सीकडून सुरक्षा पुरवली जाते, अशीही माहिती समोर आली आहे. 'शिंदे यांना आधी कारणे दाखवा नोटिस दिली जाणार असून त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतली जाणार आहे.



bottom of page