top of page

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी टाळा आणि सहकार्य करा – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : गेल्या वर्षाभरामध्ये कोरोनाचा हाहाकार आपण पाहिला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्यावेळी रुग्णांना खाटांची संख्या कमी पडली, हॉस्पिटल्स संपुर्ण भरलेली होती. त्यामुळे आता ज्या वेगाने सांगली जिल्ह्यात व सांगली महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजाराच्या ठिकाणी गर्दी टाळा, असे अवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजाराच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या उरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अर्थव्यवस्था संकटात येते. पण गर्दी थांबविली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. त्यामुळे बाजारात जाणे टाळा, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा. मास्क घालणे, स्वच्छ हात धुणे, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडणे, योग्य अंतर ठेवणे व इतरांचीही तेवढीच काळजी घेणे या गोष्टींचे पालन करावे, आपण मर्यादा सांभाळल्या तर महिन्याभरामध्ये ही लाट खाली येईल. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. हीच आपल्याला नम्र विनंती आहे. मागील वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसल्यास सर्व नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे.


bottom of page