top of page
Writer's pictureMahannewsonline

ओबीसींच्या विषयी कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा...तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही..

नांदेड : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपनं शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. " सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन", असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला .

जर ओबीसींच्या विषयी कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते मला सांगा, मीच प्रश्न सोडवतो. तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही. कारण महाराष्ट्राने तुम्हाला नकार दिलेला आहे , असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला. नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. सत्तेत आल्याशिवाय काहीच करायचं नाही का? असा सवालही जयंत पाटील यांनी फडणवीसांना विचारला आहे.

फडणवीस म्हणतात, मला सत्ता दिली तर ओबीसींना चार महिन्यात पुन्हा आरक्षण मिळवून देईन, पण सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही, मला सत्ता मिळाली की सर्व काही करेन. पण सत्ता मिळेपर्यंत मी महाराष्ट्रातील जनतेला काहीही मदत करणार नाही. ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे ?", असं प्रश्न ही जयंत पाटील यांनी फडणवीसांना केला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना श्रेय देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.


bottom of page