top of page
Writer's pictureMahannewsonline

काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले; १३ जणांचा मृत्यू

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. एएनआयनं यासंबंधी वृत्त दिल आहे. तत्पूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेननं काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

काबूल विमानतळाच्या गेटच्या बाहेर आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवलं. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. या हॉटेलमध्ये ब्रिटनचे सैनिक सध्या तळ ठोकून आहेत. हे सैनिक अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. आत्मघाती हल्ले झाले तेव्हा विमानतळाच्या परिसरात हजारो लोक उपस्थित होते. पाश्चिमात्य देशातील सैनिकांना लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे., असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. काबूलनंतर कझाकिस्तानच्या ताराज शहरात स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एका लष्करी तळावर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आत्मघातकी हल्ल्यापूर्वी काबूल एअरपोर्टवर इटलीच्या एका विमानावर गोळीबार करण्यात आला होता. या विमानात अफगाणिस्तानातील १०० शरणार्थी होते.


bottom of page