top of page
Writer's pictureMahannewsonline

Video: देश सोडण्यासाठी हजारो नागरिकांची काबूल विमानतळावर गर्दी

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा माघारी परतल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला आणि अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केलं आहे. तालिबानने राजधानी काबूलवर कब्जा करत शांततापूर्ण मार्गाने सत्तांतरण सुरु असल्याचं जाहीर केलं असलं तरी हजारोच्या संख्येने नागरिकांनी देश सोडण्यासाठी विमानतळावर गर्दी केली.

दरम्यान रविवारी रात्री तालिबानने काबूलमधील अनेक भागांवर कब्जा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केल्याचं चित्र रविवारी सायंकाळपासून दिसत होतं. सोमवारी पहाटेसुद्धा हजारो लोकं विमानतळावर पहायला मिळाली. काबूलमधील हमीत करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारो लोकांची गर्दी पहायला मिळाली. बंडखोरांनी रविवारी काबूलनजीकच्या जलालाबाद शहरावर कब्जा मिळवल्यानंतर काही तासांत अमेरिकी दूतावासाजवळ बोइंग सीएच-४७ चिनुक हेलिकॉप्टर्सची वर्दळ सुरू झाली. आपल्या राजकीय सल्लागारांना आणि अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी अमेरिकेने हालचाल सुरु केली. मात्र दुसरीकडे अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारोच्या संख्येने नागरिक दिसून आले. मागील आठवड्याभरापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सुरु केलेला सशस्त्र संघर्ष पाहून हजारो लोक देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून काबूलमध्ये दाखल झालेले. अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या तयारीत अनेकजण होते. मात्र त्यापूर्वीच तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाल्याने विमानतळावर हजारो लोकांची गर्दी पहायला मिळाली.

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना काबूल विमानतळाचा वापर टाळावा अशा सूचना जारी केल्याचं ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याच बातमीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी तालिबान विमानतळावर गर्दी केल्याची माहिती प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काहीजणांनी दिलीय. एकीकडे नागरिक देशाबाहेर पळून जाण्यासाठी विमानतळावर दाखल झालेले असतानाच विमानतळ परिसरामध्ये रात्रभर गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता.




bottom of page