top of page
Writer's pictureMahannewsonline

ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकाचाच ऑक्सिजनअभावी मृत्यू!

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मूळचे महाराष्ट्राचे असणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन झालं आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्यावर रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. त्यासंदर्भात त्यांच्या नावावर ७ पेटंट देखील होते . पण दुर्दैव म्हणजे ऑक्सिजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या संशोधकालाच अखेरच्या क्षणी ऑक्सिजन मिळाला नाही. त्यांचंच ऑक्सिजनअभावी निधन झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून तसेच कोल्हापूरसह राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. लॅबमधील काही इतर सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डॉ. काकडे यांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले. ४४ वर्षीय डॉ. काकडे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागली. शेवटच्या काही दिवसांत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधाराणा देखी होऊ लागली होती. मात्र, मंगळवारी रात्री रुग्णालयातला ऑक्सिजन पुरवठा संपला. यामध्ये प्राण गमवावे लागलेल्या १० रुग्णांमध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता. आयुष्यभर ऑक्सिजनवर संशोधन करणारे डॉ. काकडे यांनाच शेवटच्या क्षणी ऑक्सिजन मिळू शकला नाही.



डॉ. काकडे हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्याच्या एका लॅबमध्ये त्यांनी संशोधनाचं काम केलं. पुढे जपानच्या टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते काही काळ कार्यरत होते. चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये ते वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू होते. आपल्या संशोधनाच्या जोरावर त्यांनी ७ पेटंट आपल्या नावावर केले आहेत.




bottom of page