top of page
Writer's pictureMahannewsonline

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज(शनिवार) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ येथील संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. दोन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते . कल्याण सिंह यांनी राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं होतं.

कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या विकासात कल्याण सिंह यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपचे एक प्रमुख नेते होते. कल्याण सिंह मुख्यमंत्री असतानाच अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. मात्र, मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला होता.



bottom of page