top of page
Writer's pictureMahannewsonline

विद्यार्थी रमले पक्ष्यांच्या अनोख्या विश्वात

जाणून घेतली शास्त्रीय माहिती; किलबिल नेचर क्लबच्या वतीने उपक्रमाचे आयोजन


गडचिरोली : पक्षी हे रानाला पडलेले सुंदर स्वप्न आहे, असे म्हणतात. या नितांत सुंदर उडत्या निसर्ग सौंदर्याचे निरीक्षण प्रत्येकालाच आनंद देणारे असते. वन्यजीव सप्ताहानिमित्त किलबिल नेचर क्लबच्या वतीने आयोजित पक्षी निरीक्षण शिबिरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत या अनोख्या पक्षीविश्वाचे दर्शन घेत पक्ष्यांबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेतली.

या शिबिरात स्थानिक आठवडी बाजारापासून बोरमाळा नदीघाटापर्यंत भ्रमण करत विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर व मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी माळरानावरील पक्षी, वृक्षांवरील पक्षी, पाणपक्षी, त्यांचे प्रकार, प्रजाती, त्यांचे विणीचे हंगाम, घरट्यांचे आकार, पिल्लांचे संगोपन, पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, पक्षिनिरीक्षणाच्या पद्धती, त्यासाठी काय काळजी घ्यायची, काय साहित्य वापरायचे आदी विषयांवर शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पक्षी हे पर्यावरणातील संतुलनाचे निदर्शक असून पक्ष्यांची संख्या कमी झाल्यास त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर व पर्यायाने मानवावर होतो. वाढती वृक्षतोड, वाढलेले औद्योगिकीकरण, विकासकामांच्या नावावर होणारी वृक्षतोड यामुळे पक्ष्यांवर संकट आले असून सर्वांनी पक्षी संरक्षण व संवर्धनासाठी कार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. या शिबिरात वसंत विद्यालय, पं. जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा व विद्याभारती शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूरचे ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे उपस्थित होते. तसेच क्रेन्स (कंझर्वेशन, रिसर्च अ‍ॅण्ड नेचर एज्युकेशन सोसायटी) च्या सचिव अंजली कुळमेथे, संस्थेचे मार्गदर्शक राजेश इटनकर, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, पं. जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक सूर्यकांत मडावी, महेंद्र शेडमाके, वसंत विद्यालयाच्या शिक्षिका मीरा बिसेन, विद्याभारती शाळेच्या शिक्षिका प्रतिभा रामटेके, सुनंदा चिलबुले, खुशाल ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


३३ प्रजातींचे दर्शन...

या पक्षी निरीक्षण शिबिरात विविध प्रजातींच्या तब्बल ३३ पक्ष्यांचे निरीक्षण शिबिरार्थ्यांना करायला मिळाले. यात राखी धनेश, चातक, ढोकरी, बगळा, कवडी मैना, शेंडीवाली मैना, लालबुड्या बुलबुल, थिरथिरा किंवा कापरा, गप्पीदास, राखी वटवट्या, ठिपकेवाली मुनिया (मनोली), तिरंगी मुनिया, लाल मुनिया, गांधारी, नकल्या खाटीक, वेडाराघू, हरीयल, तांबट, खंड्या, नीलपंख, पिंगळा, गाणारा चंडोल, कोतवाल, रानकावळा अशा विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासोबतच ग्रास येलोव्ह, कॉमन क्रो, कॉमन ग्रास ब्राऊन आदी फुलपाखरे, फनेल वेब स्पायडर, सिग्नेचर स्पायडर आदी कोळ्यांच्या प्रजाती व शरपुंखा, बला, भुईआवळा अशा अनेक वनौषधींची माहितीही शिबिरार्थ्यांना देण्यात आली.


bottom of page