top of page
Writer's pictureMahannewsonline

ऐन पोटनिवडणुकीवेळी भाजपला पंढरपुरात मोठा धक्का; कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूरः भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची लढत आता प्रतिष्ठेची बनली असताना ऐन पोटनिवडणुकीची काळात भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कल्याणराव काळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे,

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, " कल्याणराव काळे व त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद निश्चितपणे वाढेल. आणि त्याचबरोबर पक्षाची ताकद वाढत असताना त्याठिकाणी कल्याणराव काळे यांचीही ताकद वाढेल याची काळजी निश्चितपणे घेतली जाईल. कल्याणराव काळे ज्या पक्षातून राष्ट्रवादीत आले आहेत, त्या पक्षानी त्यांचं किती कल्याण केलं हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळं राष्ट्रवादीतच त्यांचं कल्याण केलं जाईल."

कल्याणराव काळे यांना पंढरपूर आणि माढ्यामध्ये मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर भागातील ४३ गावांमध्ये काळे यांचा प्रभाव आहे. कल्याणराव काळे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी काही दिवसांपू्रर्वीच म्हटलं होतं. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते.


bottom of page