top of page
Writer's pictureMahannewsonline

कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी कोरोना निगेटीव्ह अहवाल आवश्यक; विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजेन तपासणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढता रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी, आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या व अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या सूचना

  • संस्थात्मक अलगिकरण करण्यावर भर द्या.

  • अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर, फिरते विक्रेते यांची अँटिजेन तपासणी करा.

  • नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी

  • रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करुन घ्या.

  • शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात

  • गाव निहाय व प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले

  • कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य गरजेचे आहे.

  • तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांचा धोका लक्षात घेऊन लहान बालकांसाठी सोयी सुविधा निर्माण करायला हव्यात.

  • हेल्पलाईनद्वारे नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती तात्काळ मिळवून द्यावी. तसेच व्हेंटिलेटरयुक्त बेड वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लवकरात- लवकर कमी होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले

  • कोविड सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात.

  • ग्रामीण भागातील रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

  • फिरत्या पथकांमार्फत शहर व गावांमध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करुन घ्यायला हवी.

  • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास जिल्ह्याचा रुग्णदर कमी होईल

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.


बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





bottom of page