top of page

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...

प्रिय बाबासाहेब,

पत्र लिहण्यास कारण की, आज तुमची खूप आठवण येत आहे. आजच्या काळात कुणी पत्र लिहितात की नाही मला माहिती नाही. पण मला आज तुमच्यासमोर व्यक्त व्हायचे आहे म्हणून तुमच्या लेकराचा हा छोटासा लेखप्रपंच...

आज तुम्हाला जाऊन ६६ वर्ष पुर्ण होत आहे. या ६६ वर्षामध्ये खूप काही बदलले. या ६६ वर्षामध्ये अजूनही तुम्ही बघितलेला समाज एकजुट होवू शकला नाही, संघटीत बनू शकला नाही. समाजाची सध्याची दशा आणि दिशा बघताना अत्यंत दुःख होत आहे. आज प्रत्येकजण तुमच्या नावाचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतो आहे. पण विचार पुढे घेऊन जाणारा कुणी समोर येत नाही. आज आपला समाज गटा- गटामध्ये विभागलेला आहे. म्हणूनच की काय? आज आपल्या समाजावर अन्याय-अत्याचार करतांना शत्रू थोडा सुद्धा घाबरत नाही. म्हणून बाबासाहेब या मार्ग चुकलेल्या तुमच्या अनुयायांना तुमच्या मार्गदर्शनाची आज खूप जास्त गरज आहे...


संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले,

कोणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले

तु पाहिलेली स्वप्न पुर्ण झालीत का रे?

भीमा तुझ्या मतांची माणसे मेलीत का रे?


अशी म्हणायची वेळ आज दुर्दैवाने आमच्यावर आलेली आहे. कारण बाबासाहेब, आज समाजातील सद्यस्थिती बघवत नाही. समाजातील ज्वलंत प्रश्न ज्यावेळी आम्ही बघतो तेव्हा तुमची आणि तुमच्या विचारांची गरज वेळोवेळी आम्हाला जाणवत असते. आम्हाला तुम्ही विचाराचे पाईक होण्यास सांगितले. पण आज परिस्थिती खूप वेगळी झाली आहे. कारण आम्ही विचाराचे नाही तर व्यक्तीपुजक झालो आहे. कर्तृत्व नसतानाही आम्ही अनेकांना डोक्यावर घेतो आहे. म्हणून दोन-चार लोकांना एकत्र करून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत घरोघरी स्वयंघोषित राष्ट्रीय नेते, संघटना, पक्ष दररोज तयार होत आहे आणि आम्हीच आमच्या समाजाची रीतसर वाटणी करत चाललो आहे. तेव्हा सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, बाबासाहेब तुमच्या विचाराचा, तुमच्या मताचा प्रामाणिक माणूस आज उरलेला नाही...

बाबासाहेब, तुमचा इतिहास वाचल्यावर अंगावर काटे उभे होतात पण आज तुमचा इतिहास लोक वाचताना दिसत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. तुम्ही संघर्ष करून हजारो वर्षाचा इतिहास बदलून टाकला. त्यावेळी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारे तुमचे अनुयायी प्रामाणिक होते. पण आज तुमच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी, त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी अनुयायी हिरहिरीने पुढे येत नाही. तेव्हा वाटते की हे अनुयायी खरंच तुमच्या विचाराचे आहेत की नाही? कारण हे अनुयायी आता साडी, माडी आणि गाडी मध्येच व्यस्त झाले आहेत...


बाबासाहेब, तुम्ही भारतीय संविधान लिहुन इथल्या शोषित- पिडीत, दीन-दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. जगातील सर्वात सुंदर ग्रंथ लिहून आपण संविधानाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार देशातील सर्व नागरिकांना बहाल केला. हक्क, अधिकार दिलेत. पण तुम्ही गेल्यानंतर शासनकर्त्यांनी कायद्याची योग्य ती अंमलबजावणी केली नाही. म्हणून आजही देशामध्ये जात, धर्म, लिंग, वंश या आधारावर भेदभाव मोठ्या प्रमाणावर केला जातो. आजही लोकांच्या आडनावावरून त्यांची जात शोधली जाते. दररोज जाती-धर्माच्या नावावर दंगली घडविल्या जातात. हे सर्व बघत असताना फार वाईट वाटते..

'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही'. असा अनमोल संदेश आपण समाजाला दिला. परंतु आज शिक्षण घेणारे करोडो झालेल पण गुरगुरणारा एकही समोर येत नाही. तेव्हा वाटते की शिक्षणरूपी दुधात भेसळ तर झाली नाही ना? कारण शिक्षणाचे महत्व ओळखून तुम्ही शिक्षण घेण्यासाठी सांगितले. पण आज आम्ही कोणते आणि कशाप्रकारे शिक्षण घेत आहे यावर सुद्धा चिंतन होणे आवश्यक आहे. कारण आमच्या व्हॉट्सॲपमध्ये कॉलेजकट्टा नावाचे अनेक ग्रुप दिसतील पण पुस्तककट्टा नावाचा एखादा ग्रुप हल्ली शोधूनही सापडत नाही...


बाबासाहेब, तुम्ही जगातील एकमेव असे व्यक्ती होते की, ज्यांनी पुस्तकासाठी 'राजगृह' नावाचा बंगला बांधला. तुमच्या घरात प्रवेश केला की, डोळ्यासमोर हजारो पुस्तके दिसायची पण आज आमच्या घरात पुस्तके तर आहेत पण वाचन करणारी माणसं आता उरली नाही. पुस्तकाची जागा आमच्या हातातील मोबाईलने कधी घेतली हे कळलेच नाही. त्यामुळे अन्याय-अत्याचार झाले की आम्ही मोबाईलवर स्टेटस ठेऊन विरोध दर्शवितो पण रस्त्यावर उतरून विरोध करण्याची धमक आमच्यात उरलेली नाही. कारण आम्ही शांत असतो अन्याय-अत्याचार झाला तरीही...


बाबासाहेब, तुम्ही समाजासाठी स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष केलं. स्वतःच्या पोटची मुले मरण पावली तरीही समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यत लढत राहीलात, झटत राहीलात. पण आज हे पत्र लिहताना डोळ्यात पाणी येत आहे. कारण तुमच्या कार्याची, त्यागाची अन समर्पणाची जाणीव तुमच्या कितीतरी अनुयायांना नाही. आज इथला समाज तुमच्यामुळे शिकला, सवरला, मोठ्या पदावर गेला अन तुम्हालाही विसरून गेला आहे याचे अत्यंत दुःख वाटते आहे...

कधी काळी घरात राहणारी महिला आज घराबाहेर पडू शकली, मोठ्या पदावर गेली हे बाबासाहेब तुम्ही दिलेल्या संविधानिक हक्क आणि अधिकारामुळे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की यातील काही महिला अशा आहेत जे विचारतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? तेव्हा खरंच अशा लोकांची कीव येते. आजही जातीचा चष्मा कित्येक शिक्षित झालेल्या लोकांच्या डोळ्यावरून उतरलेला नाही. आजही तुम्हाला लोकांनी एका समाजापुरते मर्यादित करून ठेवले आहे. त्यामुळे बाबासाहेब, तुम्ही परत एकदा यावे लोकांच्या मेंदूवर लागलेला जातीचा चष्मा खाली उतरविण्यासाठी...

तुमच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम भारत प्रत्यक्षात घडावा, दिशाहीन झालेला समाज एकत्र यावा, युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे, देश संविधानाच्या मार्गावर चालावा, धर्मनिरपेक्ष राष्ट्र कृतीत दिसावा, भारत देश जातीमुक्त व्हावा आणि प्रत्येकाचा माणुसकी धर्म असावा याच आशावादासह इथेच थांबतोय..

जयभीम...


- सुरज पी दहागावकर,चंद्रपुर

मो.न. 8698615848


bottom of page