top of page

पोलीस निरीक्षकाने दंड केला म्हणून वीज कर्मचाऱ्यानं थेट पोलीस चौकीचाच वीज पुरवठा केला बंद

एका पोलीस निरीक्षकानं वाहन तपासणी दरम्यान दुचाकीस्वाराला रोखलं. हा दुचाकीस्वार वीज विभागातील कर्मचारी होता. दुचाकीचे पेपर घरी असल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर निरीक्षकानं कारवाई करत ५०० रुपयांची दंडाची पावती फाडली. त्यामुळे रागावलेल्या कर्मचाऱ्यानं थेट पोलीस चौकीचा वीज पुरवठा खंडित केला. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये हा अजब प्रकार घडला. वीज नसल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. सध्या या घटनेचीच चर्चा परिसरात होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरौली पोलीस ठाण्याच्या परिसरातील हरदासपूर पोलीस चौकीत हा धक्कादायक प्रकार घडला. या चौकीचे प्रभारी वाहनांची तपासणी करत होते. याच दरम्यान बरसेर सब स्टेशनचे लाईनमन भगवान स्वरुप उर्फ पिंकी दुचाकीनं तिथून जात होते. यावेळी पोलीस निरीक्षकांनी लाईनमनला अडवून बाईकचे पेपर दाखवायला सांगितले. सध्या माझ्याकडे दुचाकीचे कागद नाहीत. घरून आणून दाखवेन, असं भगवान स्वरुप यांनी सांगितलं. मात्र पोलीस निरीक्षकांनी काही ऐकलं नाही व ५०० रुपयांचा दंड ठोठावला.

यामुळे भगवान स्वरुप नाराज झाले. त्यांनी वीज विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि पोलीस चौकीचा वीज पुरवठा खंडित केला. विजेची वायर कापून लाईनमन ती स्वत:सोबत घेऊन गेला.पोलीस कर्मचारी लाईनमनला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही त्यानं विजेचं कनेक्शन पूर्ववत केलं नाही.

हरदासपूर पोलीस चौकीत मीटरशिवाय विजेचा वापर केला जात असल्याचं स्वरुप यांनी सांगितलं. मीटरशिवाय विज वापरली जात असल्यानं लाईन कापण्यात आल्याची आणि तार कापल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं वीज विभागाचे मुख्य अभियंता असलेल्या संजय जैन म्हणाले. चौकशी अहवाल आल्यानं पुढील कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

हरदासपूर पोलीस चौकीत मीटरशिवाय विजेचा वापर केला जात असल्याचं स्वरुप यांनी सांगितलं. मीटरशिवाय वीज वापरली जात असल्यानं लाईन कापण्यात आल्याची आणि तार कापल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं वीज विभागाचे मुख्य अभियंता संजय जैन यांनी सांगितलं.


bottom of page