top of page
Writer's pictureMahannewsonline

लर्निंग लायसन्ससाठी आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज नाही

लर्निंग लायसन्स काढणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास परवानगी दिली असून तसे आदेशही राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना मंगळवारी देण्यात आले आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली.

लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओकडून परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिलं जातं. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. कोरोना लॉकडाउनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला.

राज्यात आता लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थीकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध सारथी सेवेत प्रवेश करताच परवाना पर्याय उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक नमूद केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करू शकणार आहे.

“परिवहन विभागाने राज्यातील ५० आरटीओ कार्यालयाना तसे आदेश दिले आहेत. या सुविधेमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार आहे. कार्यालयात होणार गर्दी कमी होणार असून, बेकायदेशीर एजंटांना चाप बसेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांच्या वेळेत व खर्चात बसत होईल,” असं ढाकणे म्हणाले. ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरवर्षी, महाराष्ट्रातील परिवहन विभागामार्फत सुमारे २० लाख लर्निंग लायसन्स परवाने दिले जातात. इतक्याच संख्येनं कार आणि दुचाकीची नोंदणी केली जाते. लायसन्स आणि वाहन नोंदणी करण्यासाठी देशभरात एनआयसी आणि सारथी या दोन्ही संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात आलेले असल्याची माहितीही दिली.


bottom of page