top of page

सांगली जिल्ह्यात 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन

लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना विहीत वेळेत दुसरा डोस द्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी

सांगली : राज्यात ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी 15 मे 2021 पर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून जिल्ह्यातही 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. त्यानंतर राज्य शासनाच्या भूमिकेनुसार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत लक्षात घेऊन जिल्ह्यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम (व्हीसीद्वारे), खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत (व्हीसीद्वारे), आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धतता, लसीकरण, लॉकडाऊन अंमलबजावणी आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. आणखी व्हेंटीलेटर्स वाढविण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी एकमुखाने मागणी केली. यावर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हेंटीलेटर बेड उपलब्धतेबाबत कॉल सेंटरला त्वरीत माहिती उपलब्ध झाली पाहिजे व रूग्णाला व्हेंटीलेटर बेड उपलब्ध झाला पाहिजे यासाठी यंत्रणांमध्ये अत्यंत काटेकोर समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्ह्याला दोन दिवसांमध्ये अधिकचे 30 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होणार असून राज्य शासनाकडे आणखी 20 ते 25 व्हेंटीलेटर्सची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्याला आवश्यकतेनुसार व्हेंटीलेटर्सची त्वरीत खरेदी करावी. खरेदी प्रक्रियेपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून व्हेंटीलेटर्सची तात्काळ खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगितले.

लसीकरणाचा आढावा घेत असताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 लाख 98 हजार 386 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 5 लाख 17 हजार 92 तर दुसरा डोस 80 हजार 794 जणांचा झाला आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे अशांना विहीत मुदतीत दुसरा डोस द्यावा. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरणाचे डोस मिळविण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करू, असे सांगितले. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी बोलवावे व गर्दी टाळावी, असे निर्देशित केले.

लॉकडाऊनच्या निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सध्या जिल्ह्यात प्रतिदिन 6 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या होत असून यामधील साधारणत: 30 टक्के नागरिक पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्याच्या भूमिकेनुसार 15 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून एप्रिल पासून भरती सुरू असून आत्तापर्यंत जवळपास 84 मेडिकल ऑफिसर, 360 स्टाफ नर्स, 159 लस टोचक, 32 डाटा एन्ट्री ऑपरेटर, 16 लॅब टेक्नीशियन आदि अशी 500 हून अधिक पदांची भरती करण्यात आली आहे. अजूनही आवश्यकतेनुसार भरती प्रक्रिया सुरू आहे.

या बैठकीत वाहनांसंदर्भात आढावा घेवून जिल्ह्यातील 102 प्राथमिक आरोग्य केंद्र ॲम्बुलन्स, 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स आणि ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयाकडील ॲम्बुलन्सचा आढावा घेवून येत्या काळात प्रत्येक तालुक्याला एक या प्रमाणे कार्डिॲक ॲम्बुलन्स उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. मिरज मेडीकल कॉलेज येथे 30 आयसीयु बेड्स वाढविण्यात येत असून सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे 500 बेड्सच्या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाबरोबर चर्चा सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्याला सद्या प्रतिदिन 44 मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून सदरचा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिवीर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रूग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा व्हावा अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

सद्यस्थितीत होम आयसोलेशनमध्ये 13 हजारहून अधिक रूग्ण असून ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करण्याची गरज व्यक्त करत असतानाच होम आयसोलेशनमधील व्यक्तींच्या घरी अत्यावश्यक साहित्य, औषधे पोहोच करण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती व त्या व्यक्तीच्या घरातील अन्य व्यक्ती घराबाहेर पडण्याला पायबंद घातला जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी लोकप्रतिनिधींनी कोरोना संदर्भातील तालुक्यांची विविध बाबींची गरज मांडली. यामध्ये व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविणे, खाजगी रूग्णालयांमधून आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी विहीत वेळेत रूग्ण संदर्भित करणे, लसीकरणावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आदि बाबींची आवश्यकता अधोरेखीत केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सविस्तर सादरीकरण केले.


bottom of page