top of page
Writer's pictureMahannewsonline

लोकमंगल अन्नपूर्णा योजना बनली निराधारांचा आधार

दहा लाख डब्यांचा टप्पा झाला पूर्ण

सोलापूर : आजच्या समाजात माणुसकी हरवत चालली आहे. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना दोन-चार वेळा जेवण देण्याबाबतही विचार केला जात आहे. अशा स्थितीतही दररोज जवळपास 550 निराधार, दिव्यांग व्यक्तींना जेवणाचे डबे घरपोच करण्याचे काम लोकमंगल अन्नपूर्णा योजनेतून केले जात आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीच्या जोरावर लोकमंगल अन्नपूर्णा योजनेने शुक्रवारी दहा लाख डबे देण्याची सेवा पूर्ण केली आहे.

आ. सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून लोकमंगल अन्नपूर्णा ही निराधार लोकांसाठी जेवणाचे डबे पुरवणारी योजना 8 मार्च 2013 पासून सुरू झाली. सुरुवातीच्या काळात संथ गतीने सुरू असलेल्या या योजनेला पुन्हा सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक दानशूरांनी या योजनेसाठी मदत करण्यास सुरुवात केली. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ हे न आणता रोख स्वरूपात रक्कम घेऊन त्याच्या दुप्पट रक्कम संबंधित वाढदिवस असणार्‍या व्यक्तीने अन्नपूर्णा योजनेसाठी देऊ केली. अशा प्रकारे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीच्या जोरावर लोकमंगल अन्नपूर्णा योजना जवळपास दहा लाख डबे देण्याची सेवा शुक्रवारीवारी पूर्ण केली.

अन्नपूर्णा योजनेसाठी 17 जणांचा स्टाफ आहे. पाच रिक्षांद्वारे डबे सर्वांना घरपोच करण्यात येतात. मागील दोन वर्षांच्या काळामध्ये देशामध्ये लॉकडाऊन होता. मात्र या काळातही लोकमंगल अन्नपूर्णाची सेवा अविरतपणे सुरू होती. यावर्षीपासून सिव्हीलमध्ये असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनाही अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून डबे पोहच करण्यात येत आहेत.आजच्या माणुसकी हरवत चालेल्या जगात लोकमंगलची ही अन्नपूर्णा योजना गोरगरिब आणि निराधार लोकांसाठी एक वरदान बनली आहे. लोकमंगल फौंडेशनचे संस्थापक रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्टाफचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.


सामाजिक बांधलकीतूनच फौंडेशनची स्थापनाः आ. देशमुख
 समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठीच सामाजिक बांधलकीतून लोकमंगल फौंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजनाही त्याचाच एक भाग आहे. या योजनेला समाजातील अनेक दानशूर लोकांनी सहकार्य केले आहे. त्यांचेही यासाठी मोठे योगदान आहे. आगामी काळातही समाजासाठी जेवढी शक्य आहे, तेवढी मदत फौंडेशनच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

bottom of page