top of page

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर आता...

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २२ मार्च रोजी एलपीजीच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर देशभरात आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरधारकांना दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. असे असले तरी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल दरात २५० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे दर वाढण्याची शक्यता आहे.


घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. आतापर्यंत मागील दोन महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३४६ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तर गेल्या आठवड्याभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही आठवेळा वाढ करण्यात आली आहे.



पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २२ मार्च रोजी ५० रुपयांनी दरवाढ करण्यात आल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसचे दर ९५० च्या घरात पोहचले. १९ किलोंचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर आजपासून २२५३ रुपयांना मिळणार आहे. तर, कोलकातामध्ये हा दर २०८७ ऐवजी २३५१ रुपये आणि मुंबईत १९५५ च्या ऐवजी २२०५ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत २४०६ रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅस दरवाढ, इंधन दरवाढीमुळे आता हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे दर वाढण्याची शक्यता आहे.


bottom of page